Ad will apear here
Next
शेगावच्या गजानन महाराज संस्थानातील अनोखे मॅनेजमेंट...


शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थान हे विदर्भासारख्या ग्रामीण भागात असलेलं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. हजारो लोक तिथे रोज दर्शनाला येतात. भली मोठी दर्शनबारी असते. लोक भक्तिभावाने रांगेत चालत दर्शनाची वाट पाहत असतात. बऱ्यापैकी शांतता असते. मध्येच एखादा जयघोष निनादून जातो. शांतता ठेवायला सेवेकरी (निःशुल्क सेवा देणारे) तत्पर असतात; पण त्यांनाही ‘शशश...’ इतकंच म्हणावं लागतं, की सर्वत्र शांतता होते. बरेच ठिकाणी टांगून ठेवायच्या ऐवजी ते हातात ‘शांतता राखा’चा फलक घेऊन उभे राहतात. काय बिशाद की कुठे आवाज होईल. आणि हे सर्व धाकदपटशा करून नाही तर स्वयंप्रेरणेने चालू असतं. दर्शनबारीत तुम्हाला पाणी, चहा निःशुल्क उपलब्ध आहेच; पण नैसर्गिक विधीला जायचं असल्यास ती व्यवस्थाही चोख असते. जिथं आहात तिथून बारीतून बाहेर पडल्यावर पास मिळतो. विधी उरकून परत पास दाखवून पुन्हा बारीत तुम्ही बाहेर पडलेल्या जागीच प्रवेश करायचा. 

स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर मात्र तुम्हाला जोरदार सुखद धक्का बसतो. नाही नाही, स्वच्छतागृह खूप स्वच्छ असतं, अशा चिल्लर बाबीसाठी नाही धक्का बसत. कारण स्वच्छतागृह स्वच्छ असणं हा तिथे नित्याचाच भाग असतो. धक्का असा बसतो, की त्या प्रवेशद्वारावर पाच-सहा छोटे छोटे कप्पे असलेली एक खुली रॅक असते आणि सूचना लिहिलेली असते ‘हार-फुले ठेवण्यासाठी’!! 

आपण स्वच्छतागृहात हार-फुले घेऊन जाणार नाही (हो, भक्तिभावाने दर्शन घेणारा पापभीरू हिंदू, जो पुरोगामी वगैरे नसतो, तो पूजासाहित्य आत नेणार नाहीच) हे लक्षात घेऊन ते ठेवण्यासाठी सुंदर सुरेख, चार-पाच लोक हार ठेवू शकतील, इतके कप्पे असलेली रॅक बाहेर लावलेली असते. जे व्यवस्थापन इतका सखोल आणि अत्यावश्यक विचार करू शकते आणि तशी व्यवस्था करू शकते, त्यांच्या बाबतीत काय लिहावं, त्यांचं कौतुक करावं की आभार मानावेत, हेच समजत नाही. 
इतक्यात पूर्णविराम होत नाही. समाधी दर्शन, गादी दर्शन घेऊन तुम्ही बाहेर येता, तोवर महाप्रसाद बारी लागलेली असते. पुन्हा बारी, पुन्हा तीच व्यवस्था, तीच शांतता आणि शिस्त आहेच. २५०-३०० लोक एका वेळी बसू शकतील असे चार हॉल असतात. भाविक येत राहतात, जेवणं चालूच असतात आणि एकूण चार ते पाच हजार लोक रोज जेवण करून जातात. जेवणाची व्यवस्था अवर्णनीय असते. स्वच्छ चकाकणारे स्टीलचे पाच खणी तबक, पोळी, वरण, भात, एक फळभाजी आणि एक कडधान्याची भाजी हा मेनू असतो आणि प्रसाद म्हणून वडी, शिरा वा लाडू असतो. वाढून देणाऱ्या सेवेकऱ्यांच्या हातात हातमोजे, अंगावर अॅप्रन, मंगलवेष (पांढरा सदरा-पायजमा) आणि स्त्री सेवेकऱ्यांचे डोके पदराने झाकलेले असते. आपापले ताट वाढून घेऊन टेबलावर जाऊन बसायचे. तिथेच टेबलावर पाण्याचा ग्लास भरलेला असतो आणि धक्का लागून तो पडून जमीन ओली होणे हा नित्याचा प्रकार होऊ नये म्हणून ग्लाससाठी एक खोबण असते, त्यात तो ग्लास फिट बसतो. दुसऱ्यांदा वाढण्यासाठी सेवेकरी तत्परतेने ढकलगाडी (ट्रॉली) घेऊन फिरत असतात. त्यात कोणत्या कप्प्यात काय आहे म्हणजे डाळ, भाजी, कडधान्य उसळ इत्यादी याची नेमप्लेट दर्शनी भागावर असते. सेवेकरी तीच स्वच्छता सांभाळत आपुलकीने वाढत असतात. जेवणाची अमृततुल्य चव, चटका बसेल इतकं वाफाळलेलं अन्न, माफक तेल आणि मसाला असं सात्त्विक, सुग्रास जेवण झाल्यावर एका ट्रॉलीवर ताट नेऊन द्यायचे असते. तिथे आधी त्यातले खरकटे अन्न एका कप्प्यात जमा करून ताट धुवायला पाठवले जाते. 

तुम्हाला दुसरा धक्का आता इथे बसायचा असतो. उष्ट्या पत्रावळीवरची शिते वेचून खाऊन अन्न हे पूर्णब्रह्म हे उक्तीऐवजी कृतीतूनच महाराजांनी शिकवलेले आहेच. त्यामुळे बहुतांश भाविक ताटात उष्टे टाकत नाहीतच; पण एखाद्याच्या ताटात उष्टे दिसले तर सेवेकरी उष्टे न टाकण्याची विनंती करतो आणि जर एखाद्या भाविकाने उरलेले अन्न बांधून सोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर ते पॅक करण्यासाठी सोबतच्या सेवेकऱ्यांच्या अॅप्रनच्या समोरच्या खिशात आयताकृती व्यवस्थित कापलेले कागद तयारच आहेत. हो, खरंच आहेत. 

कोणत्या मॅनेजमेंच्या पदव्या घेतल्यायत ह्या लोकांनी? कुठे प्रशिक्षण घेतले? महाराजांविषयी हृदयातील निस्सीम श्रद्धा आणि मनातील सेवाभाव ह्याच्या भरवशावर, एखाद्या मोठ्या कारखान्यात व्यवस्थापनात मोठ्या पदव्या घेतलेले तज्ज्ञ कसं नियोजनबद्ध आणि गुणवत्तेवर भर देत काम करून घेतात, तसे महाराजांच्या आशीर्वादाने मा. ह. भ. प. शिवशंकरभाऊ पाटलांच्या मार्गदर्शनात हे अखंड सेवाकार्य चालते. इथे सेवेकरी आहेत आणि पगारी नोकरही आहेत. चप्पल स्टँडवर चप्पल व्यवस्थापन ते बागकाम ते स्वच्छताकर्मी ते हिशोबनीस ते स्वयंपाकघरातील काम ते वैद्यकीय काम अशा विविध सेवा देण्यासाठीही नावनोंदणी करावी लागते आणि त्याचीही वेटिंग लिस्ट आहे. वर्ष-दोन वर्षांनी नंबर लागतो. शिवशंकर भाऊ संस्थानचा चहाही पीत नाहीत, इतका निःस्वार्थ भाव त्यांच्या ठायी आहे त्यामुळे सगळीच टीम त्याच निर्मोही निःस्वार्थ भावनेने काम करते. संस्थानचे बरेच सेवाकार्य चालते. वारकरी प्रशिक्षणापासून फिरत्या दवाखान्यापर्यंत आणि सातपुड्याच्या आदिवासी भागातील सेवाकार्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत वेगवेगळे ४२ सेवा प्रकल्प आहेत. ते अहोरात्र चालूच असतात. पैसा साठवायचा नाही, तो फिरता राहिला पाहिजे, या महाराजांच्या शिकवणुकीनुसार बांधकामे, अन्नदान, सेवाकार्य आदी चालतात. पैसा येत राहतो अन् काम चालूच राहते. पैशासाठी काम कधी थांबले नाही, हे भाऊ विनयाने सांगतात. कालचा आवक-जावकचा हिशेब आणि शिल्लक ही माहिती रोज फलकावर जाहीररित्या लिहिली जाते. 

पारदर्शकता, विश्वसनीयता या शब्दांच्या नव्या व्याख्या शेगावच्या या संस्थानात तयार झाल्या आहेत. काय म्हणावे या व्यवस्थेला, ती आखणारे संस्थानचे पदाधिकारी आणि विश्वस्त आणि राबवणाऱ्या सेवेकऱ्यांना... शब्दच नाहीत. केवळ शब्दातीत! खरं म्हणजे शब्दबद्ध करण्यापेक्षा सरळ नतमस्तकच व्हायचं!!

गण गण गणांत बोते!

(हा सोशल मीडियावरील फॉरवर्डेड लेख आहे. लेखकाचे नाव अज्ञात आहे.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYZQCN
Similar Posts
श्री खंडोबा-म्हाळसा शाही विवाहाला लाखोंचा जनसागर पाल (ता. कराड, जि. सातारा) : पाल येथे तारळी नदीच्या काठी महाराष्ट्रासह युगानुयुगे भक्तांची आर्त हाक ऐकण्यासाठी उभा असलेला, कष्टकरी व श्रमकरी वर्गाचे दैवत असलेला श्री खंडेराया बुधवारी (आठ जानेवारी २०२०) गोरज मुहूर्तावर मानकरी वर्गाच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार शाही पद्धतीने पिवळ्याधमक झालेल्या पालनगरीमध्ये म्हाळसादेवींशी विवाहबद्ध झाला
Flame of Hope Today, the temple in polo forests of Gujarat lies abandoned and forgotten, plundered by Izlamic invaders centuries ago. The sanctum sanctorum is bare, the Murti being destroyed, stolen or lost long ago. The shikhara has plants growing from it. Only curious weekend ‘tourists’ visit the temple now, to
तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय स्थापत्यशास्त्र! तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील १००० वर्षांपूर्वी, चोला राजवटीत, साधारण २०-२५ वर्षांत बांधून पूर्ण केलेले बृहदीश्वर मंदिर हा भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अचंबित करणारा नमुना आहे!
कुरवपूरच्या प्रवासाची गोष्ट... ग्रॅनाइटच्या मोठमोठ्या दगडांनी बनवलेल्या पुरातन मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. गर्भागृहात उजव्या बाजूला पाहिले, की श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन होते. मन प्रसन्न करणारी शांतता, अष्टगंधाचा दरवळणारा सुगंध यामुळे साऱ्या दुःखांचा विसर होतो आणि माणूस देवाला आपोआप शरण जातो. स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ इथे कायम विराजमान असतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language